लहानपणी उन्हाळा आला की घरच्या अंगणात पापड वाळवण्याचा आनंद काही वेगळाच होता. आई-आजींच्या सोबतीने पापड लावायचे आणि मस्त उन्हात त्यांना सुकताना पाहायचं. कुरकुरीत, लज्जतदार साबुदाणा पापड, जो उपवासाच्या ताटाला एकदम परिपूर्ण टच देईल आज बनवूया घरच्या घरी साबुदाणा पापड.

साहित्य:
- १ कप साबुदाणा
- ४ कप पाणी
- चवीनुसार मीठ
- हवे असल्यास थोडीशी हिरवी मिरची पेस्ट
कृती:
- एका मोठ्या भांड्यात साबुदाणा स्वच्छ धुऊन ४-५ तास पाण्यात भिजवून ठेवा.
- एका जाड बुडाच्या पातेल्यात ४ कप पाणी उकळा, त्यात मीठ टाका.
- आता हळूहळू भिजवलेला साबुदाणा त्यात मिसळा आणि सतत ढवळत राहा.
- शिजल्यावर तो मऊ आणि पारदर्शक दिसेल.
- मिश्रण हळूहळू घट्ट होऊ लागेल आणि चमच्याला चिकटायला लागेल.
- मिश्रण पारदर्शक आणि थोडेसे चिकटसर झाले की गॅस बंद करा.
- प्लास्टिक शीट किंवा स्वच्छ सुती कपड्यावर चमच्याने छोटे छोटे गोळे टाका आणि हलक्या हाताने पसरवा.
- उन्हात २-३ दिवस सुकू द्या.
- पूर्ण सुकल्यावर ते हवाबंद डब्यात साठवा.
- उपवासाच्या वेळी गरम तेलात तळा आणि कुरकुरीत साबुदाणा पापडची मजा घ्या.
सोप्या पद्धतीने बनवलेले हे कुरकुरीत साबुदाणा पापड घरच्या चवीची मजा देतात. उन्हाळ्यात हे करून ठेवा आणि वर्षभर कधीही तळून मस्त कुरकुरीत पापडाचा आस्वाद घ्या. बाजारात मिळणाऱ्या पापडांपेक्षा घरचे साबुदाणा पापड जास्त हलके आणि हेल्दी लागतात. आता घरीच बनवा आणि कोणत्याही वेळी तळून कुरकुरीत मजा लुटा.