उन्हाळा आला की सगळ्यात आधी आठवतो तो म्हणजे आंबा. घरात आंब्याची पेटी उघडली, की सुगंध दरवळतो आणि आमरसाची वाट पाहणं सुरू होतं. आणि यंदा काहीतरी वेगळं करून बघायचंय ना? म्हणूनच तुमच्यासाठी खास – मॅंगो केक रेसिपी! बनवायला सोपी, अंडी न घालता आणि तीही ओव्हन, कुकर किंवा कढई – कुठंही करता येईल अशी. या केकमध्ये आंब्याचा नैसर्गिक स्वाद, मऊ टेक्सचर आणि गोडसर सुगंध आहे. वाढदिवस, सण, किंवा फक्त गोड खायचं कारण – काहीही असो, ही रेसिपी तुमच्या आठवणीत नक्कीच घर करून बसेल!

साहित्य:
- मैदा – 1 ½ कप
- साखर – ¾ कप (पावडर करून)
- बेकिंग पावडर – 1 टीस्पून
- बेकिंग सोडा – ½ टीस्पून
- मीठ – एक चिमूट
- आंबा पल्प – 1 कप
- तेल – ½ कप
- दूध – ¼ कप
- व्हॅनिला इसेन्स – 1 टीस्पून
- सुका मेवा – ऐच्छिक
कृती:
- एका कढई मध्ये मॅंगो पल्प आणि थोडी साखर टाकून परतवून घ्या.
- कुकरमध्ये 1 कप मीठ किंवा रेती घाला आणि मध्यम आचेवर 5 मिनिटांसाठी प्री-हीट करा (झाकण न ठेवता).
- एका पातेल्यामध्ये तयार मॅंगो पल्प, साखर, तेल आणि व्हॅनिला इसेन्स, दूध घालून एकत्र करून नीट फेटून घ्या
- . मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चाळून घ्या. यामुळे केक हलका आणि स्पंजी होतो.
- साहित्य एकत्र करून फोल्ड करत मिक्स करा. जास्त फेटू नका. मिश्रण थोडं घट्ट वाटल्यास थोडं दूध घालू शकता. हवे असल्यास सुकामेवा घालून एक हलक मिक्सिंग करा.
- केक टिन ला बटर पेपर लावून घ्या. बटर पेपर नसेल तर केक टिन ला तेल व थोडा मैदा स्प्रेड करा.
- हे मिश्रण तयार केलेल्या केक टिनमध्ये ओता आणि 30-35 मिनिटांसाठी मध्यम आचेवर बेक करा. केकमध्ये टूथपिक घालून तपासा – ती कोरडी बाहेर आली, म्हणजे केक तयार!
टीप:
- केकच्या वरती व्हिप क्रीम किंवा आंब्याच्या स्लाइसेसने डेकोरेशन केल्यास दिसायलाही सुंदर वाटतो.
- ओव्हन 180°C वर प्री-हीट करा. ओव्हनमध्ये 30–35 मिनिटांपर्यंत बेक करा
खऱ्या अर्थाने ‘स्वाद’ तेव्हाच वाढतो जेव्हा आपण घरच्यांसोबत तो शेअर करतो. तर बनवा ही आंब्याची केक रेसिपी आणि आनंदाचे क्षण आणखी गोड करा